वैनगंगा विद्यालय पवनीचा दहावीच्या निकालात घवघवीत यश; १८ विद्यार्थी ९० टक्क्यांच्या पार
पवनी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या निकालात पवनी येथील वैनगंगा शिक्षण संस्था संचालित वैनगंगा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी यंदाही उत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९४.१९ टक्के लागला असून, तब्बल १८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
यावर्षीच्या निकालात कु. श्रावणी राजेंद्र ठोंगसे हिने ९७.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. तन्मय महेश बावनकर याने ९६.२० टक्के गुणांसह द्वितीय, तर सानिका मिताराम मेंगरे हिने ९५.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
तसेच मनस्वी सुमेध शेंडे (९४.६०%) हिने चतुर्थ, तर मोरया सोमेश्वर भजगवळी (९४.२०%) याने पाचवा क्रमांक प्राप्त करून विशेष प्राविण्य मिळवले.
निकालाची ठळक वैशिष्ट्ये :
शाळेचा एकूण निकाल : ९४.१९ टक्के
१८ विद्यार्थी : ९०% पेक्षा अधिक गुण
६० विद्यार्थी : डिस्टिंक्शनमध्य उत्तीर्ण
६२ विद्यार्थी : प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गणेशजी तर्वेकर, सचिव विनोदजी मेंढे, प्राचार्य अजयजी ठवरे, उपप्राचार्य प्रमोदजी मेश्राम, पर्यवेक्षक विकासजी रिनके तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या जिद्दीचे आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमांचे फलित आहे. भविष्यातही विद्यार्थी असेच यश संपादन करतील, असा विश्वास आहे.”
या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण पवनी परिसरातून विद्यालय व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
