Top News

चंद्रपूरच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार आक्रमक; नझुल पट्टे, रिंग रोडसह विविध मागण्या

 



चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी नझुल पट्टे, ओव्हरबर्डन (OB) व्यवस्थापन, प्रदूषणग्रस्तांना मोबदला, रिंग रोड, विमानतळ विस्तार आणि अतिक्रमण नियमन यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर निवेदन सादर करण्यात आले.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार जोरगेवार यांनी खनिज उत्खननातून निर्माण होणाऱ्या ओव्हरबर्डनच्या समस्येकडे लक्ष वेधले. सध्या केवळ पाच किलोमीटर परिसरातच ओव्हरबर्डन डम्पिंग करण्यास परवानगी असल्याने पर्यावरणीय व सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. ही मर्यादा दहा किलोमीटरपर्यंत वाढवून ओव्हरबर्डनचा वापर ग्रामीण रस्ते, सखल भागांचे भराव आणि जलसाठ्यांच्या पुनरुज्जीवनासाठी करण्याची मागणी त्यांनी केली.

चंद्रपूर महानगरपालिका आणि घुग्घुस नगरपरिषद क्षेत्रातील नझुल जमिनीवरील घरांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. शहरातील ३९ झोपडपट्ट्यांमधील सुमारे ११ हजार ८८१ कुटुंबे आणि ६० हजारांहून अधिक नागरिक या प्रश्नामुळे प्रभावित असून उर्वरित झोपडपट्ट्यांचे तातडीने सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची मागणी करण्यात आली.

कोळसा खाणी, औष्णिक वीज केंद्रे आणि सिमेंट उद्योगांमुळे वाढलेल्या प्रदूषणाचा प्रश्न मांडताना प्रदूषणग्रस्त शेतकरी व नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांना योग्य मोबदला देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी केली.

याशिवाय, चंद्रपूर व घुग्घुस शहरातील अतिक्रमित जागांचे नियमन करून १५०० चौरस फुटांपेक्षा अधिक जागांसाठी शासन दराच्या २५ टक्के शुल्कावर सरसकट पट्टे देण्याचे धोरण राबविण्याची मागणी करण्यात आली.

धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी चंद्रपूर येथील श्री माता महाकाली मंदिर देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच मोरवा विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून व्यावसायिक विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरला.

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नागपूर महामार्गाला जोडणारा स्वतंत्र रिंग रोड किंवा बायपास मार्ग मंजूर करावा, तसेच पडोली–विचोडा–छोटा नागपूर–कवठी–भटाडी–पद्मापूर–नेहरू नगर या वळण मार्गाला प्रशासकीय मान्यता देण्याची मागणीही करण्यात आली.

या सर्व मागण्यांवर अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांकडून आवश्यक अहवाल मागवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.

Previous Post Next Post