शिवगंगा जलतरण तलावातील खेळाडूंची चमकदार कामगिरी
नागभीड : येथील शिवगंगा जलतरण तलावातील पाच होतकरू जलतरणपटूंनी जिल्हास्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरावर मजल मारली आहे. विविध वयोगटांतील या खेळाडूंनी फ्रीस्टाइल, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय या जलतरण प्रकारांत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत नागभीडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत दीपतांश वानखेडे (जनता विद्यालय, नागभीड) याने १४ वर्षांखालील वयोगटात ५० मीटर फ्रीस्टाइल आणि ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवला.
मृदुल देव्हारी (जनता विद्यालय, नागभीड) याने १७ वर्षांखालील वयोगटात २०० मीटर बटरफ्लायमध्ये प्रथम, तर २०० मीटर आणि ४०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
आर्यन मेश्राम (जनता विद्यालय, नागभीड) याने १९ वर्षांखालील वयोगटात ५० मीटर फ्रीस्टाइल आणि ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले.
आराध्य अमृतकर (सांजो कॉन्व्हेंट, नागभीड) याने १७ वर्षांखालील वयोगटात २०० मीटर आणि ४०० मीटर फ्रीस्टाइल या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
तसेच युवराज बिके याने १९ वर्षांखालील वयोगटात १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये प्रथम, तर ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.
या पाचही जलतरणपटूंनी आपल्या मेहनतीच्या आणि सरावाच्या जोरावर मिळवलेले यश नागभीडसाठी अभिमानास्पद ठरले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या सर्व यशस्वी जलतरणपटूंचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेतही त्यांनी उत्तम कामगिरी करून यशाची परंपरा कायम राखावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
