नागभीड : साहित्य, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करून आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करणारे डॉ. राजन जयस्वाल यांची गोंडवाना विद्यापीठाच्या ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार-२०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय आणि दीर्घकालीन कार्याची दखल घेत विद्यापीठाने हा सन्मान जाहीर केला आहे.
विदर्भातील पहिले चारोळीकार म्हणून डॉ. जयस्वाल यांचे साहित्यविश्वातील योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते. चारोळी या लघु काव्यप्रकाराला स्वतंत्र साहित्यिक अभिव्यक्ती देत त्यांनी या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला. त्यांच्या लेखणीतून विविध साहित्यकृती साकारल्या असून अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. साहित्यानिर्मितीसोबतच विविध विषयांवर त्यांनी अनेक व्याख्याने देत समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे.
साहित्यापुरते कार्य मर्यादित न ठेवता शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. ज्ञान, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि अध्यात्म यांची सांगड घालत त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांच्या विचारप्रबोधनातून आणि व्याख्यानांमधून विद्यार्थी, युवक तसेच समाजातील विविध घटकांना प्रेरणा मिळाली आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या १५व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शोध समितीच्या शिफारशीनुसार तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमार्फत गठित समितीच्या अंतिम शिफारशीनुसार डॉ. जयस्वाल सर यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. २ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे आयोजित वर्धापन दिन सोहळ्यात डॉ. राजन जयस्वाल यांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार-२०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
बहुआयामी कार्याचा विद्यापीठीय पातळीवर झालेला हा गौरव म्हणजे एका साहित्यिकाच्या लेखणीपासून समाजसेवकाच्या कार्यापर्यंत आणि शिक्षण-धार्मिक क्षेत्रातील योगदानापर्यंतच्या प्रदीर्घ जीवनप्रवासाची मानाची पावती ठरणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
