सिंदेवाहीत गोलपल्लीवार पित्या-पुत्राचा प्रेरणादायी रक्तदान उपक्रम; समाजातून कौतुकाचा वर्षाव
सिंदेवाही : “रक्तदान म्हणजे जीवनदान” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत सिंदेवाही येथील पित्या-पुत्राने समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. दसरा चौक येथे आयोजित रक्तदान उपक्रमात स्वामी गोलपल्लीवार यांनी तब्बल ३२ व्यांदा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली, तर त्यांचा मुलगा सक्षम गोलपल्लीवार याने प्रथमच रक्तदान करत समाजसेवेची प्रेरणादायी सुरुवात केली.
या अनोख्या पित्या-पुत्राच्या रक्तदान उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. रक्तदानावेळी आशिष चिंतलवार, देवा मंडलवार तसेच मिलिंद चिमुरकर उपस्थित होते. त्यांनी दोघांचे अभिनंदन करत तरुणांनी रक्तदानासारख्या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
स्वामी गोलपल्लीवार यांनी अनेक वर्षांपासून नियमित रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सक्षम गोलपल्लीवार याने केलेले पहिले रक्तदान युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर मदत मिळावी आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या पित्या-पुत्राच्या सामाजिक बांधिलकीचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.
