Top News

देवसरा–मेंढा–खांबाळा मार्गाची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची विदर्भ राज्य आंदोलन समिती ची मागणी

 देवसरा–मेंढा–खांबाळा मार्गाची दुरवस्था;  तात्काळ दुरुस्तीची विदर्भ राज्य आंदोलन समिती ची मागणी


गडचिरोली : धानोरा तालुक्यातील देवसरा–मेंढा–खांबाळा हा प्रमुख संपर्क मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून अपघातांचा धोका वाढला आहे.

या मार्गावरून दररोज ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, शेतकरी तसेच रुग्णांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होत असून वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समिती गडचिरोलीचे हेमंतकुमार मरकाम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन सादर करून संबंधित मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मंगळवारी कुरखेडा येथे आमदार रामदास मसराम यांनी कार्यकारी अभियंत्यांसोबत महामार्गाची पाहणी केली. यावेळी हेमंतकुमार मरकाम यांनी त्यांची भेट घेऊन देवसरा–मेंढा–खांबाळा मार्गाच्या दयनीय अवस्थेबाबत माहिती दिली. नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी तातडीने डांबरीकरण व दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी गडचिरोली तसेच संबंधित विभागाकडेही पाठविण्यात आली आहे.

Previous Post Next Post