Top News

डॉ. अतुल नागपुरे यांचे कम्प्युटेशनल केमिस्ट्रीवरील यूके पेटंट प्रकाशित

नवीन मॉलेक्युलचे रासायनिक स्ट्रक्चर अचूकपणे शोधण्याच्या तंत्रज्ञानाला आंतरराष्ट्रीय मान्यता



नागभीड : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीशी संलग्नित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. अतुल सोपान नागपुरे यांनी कम्प्युटेशनल केमिस्ट्रीवर आधारित नवीन मॉलेक्युलचे रासायनिक स्ट्रक्चर अचूकपणे शोधण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या संशोधनासाठी यूके पेटंट क्रमांक ६५४७४३४ अंतर्गत पेटंटचे दस्तऐवज दाखल करून प्रकाशित करण्यात आले आहेत.

डॉ. अतुल नागपुरे यांच्या संशोधनातील या नाविन्यपूर्ण संकल्पनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालयासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

या संशोधनामध्ये डॉ. अतुल सोपान नागपुरे यांच्यासोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. राजेंद्र एस. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक कु. प्राची प्रदीप खोब्रागडे, डॉ. प्रशिल खेमराज नारनवरे आणि विरेंद्र गजभिये यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान

डॉ. अतुल सोपान नागपुरे यांच्या नावावर आतापर्यंत दोन अमेरिकन पेटंट, एक युरोपियन पेटंट आणि पाच भारतीय पेटंट आहेत. तसेच त्यांचे सुमारे ३० आंतरराष्ट्रीय शोधनिबंध अमेरिकन केमिकल सोसायटी, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, युरोपियन केमिकल सोसायटी आणि एल्सेव्हियर यांसारख्या नामांकित प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहेत.

त्यांच्या शोधनिबंधांना मिळालेल्या स्कोपस सायटेशन इंडेक्सची संख्या एक हजाराहून अधिक असून, त्यांच्या संशोधनाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्व यावरून अधोरेखित होते.

डॉ. अतुल सोपान नागपुरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव मनोज वनमाळी, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. निलेश गोडे, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.


 “कम्प्युटेशनल केमिस्ट्री या तंत्राचा उपयोग करून नाविन्यपूर्ण मॉलेक्युलचे रासायनिक स्ट्रक्चर अचूकपणे सांगता येते. विज्ञानाच्या संशोधनामध्ये ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. यासंदर्भातील संशोधन नियमितपणे सुरू असून, त्याचे महत्त्वपूर्ण निष्कर्ष भविष्यात नामांकित आंतरराष्ट्रीय स्कोपस प्रकाशनांमध्ये प्रकाशित करण्याचा मानस आहे.”

— डॉ. अतुल सोपान नागपुरे

Previous Post Next Post