आर्णी : ग्रामीण आणि बंजारा बहुल भागातून आलेल्या हिरासिंग रामलाल राठोड यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या बुद्धिमत्ता चाचणी व अभियोग्यता परीक्षा-२०२५ मध्ये त्यांनी २०० पैकी तब्बल १९० गुण मिळवत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सावळी सदोबा परिसरातील शिवर या बंजारा बहुल तांड्यातील हिरासिंग राठोड यांच्या या उल्लेखनीय यशामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे. राज्यातील हजारो उमेदवारांमध्ये अव्वल स्थान मिळवत त्यांनी स्पर्धा परीक्षेतील आपल्या गुणवत्तेची आणि अभ्यासातील सातत्याची प्रचिती दिली.
या यशानंतर हिरासिंग राठोड यांची यवतमाळ जिल्हा परिषदेत इयत्ता ६ वी ते ८ वीकरिता पदवीधर शिक्षकपदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याने राज्यस्तरावर मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यश स्व. बंधूंच्या स्मृतींना समर्पित
आपले हे यश स्व. बंधू मोतीलाल रामलाल राठोड यांच्या स्मृतींना समर्पित करत असल्याचे हिरासिंग राठोड यांनी सांगितले. तसेच त्यांच्या पत्नी विजय हिरासिंग राठोड, वरिष्ठ सहाय्यक, संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम तसेच महाविद्यालय परिवाराकडून मिळालेले प्रोत्साहन आणि सहकार्य यांचेही त्यांनी आपल्या यशात महत्त्वाचे योगदान असल्याचे नमूद केले.
महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक, १९० गुण आणि जिल्हा परिषदेत पदवीधर शिक्षकपदी निवड, अशा तिहेरी यशामुळे हिरासिंग राठोड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांची ही कामगिरी ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.
