Top News

आशीर्वादासाठी गेलेल्या प्रियंकाला मिळाली आर्थिक भेट.....सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे १२ हजार रुपयांचे बक्षीस देऊन सत्कार

 


बल्लारपूर  : श्री बालाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, बामणी, ता. बल्लारपूर येथील विद्यार्थिनी प्रियंका गोपाल मंडल हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत NEET परीक्षेत ५६० गुण मिळवून प्रथम फेरीतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविला. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

अमितनगर (बामणी), ता. बल्लारपूर या छोट्याशा गावातील प्रियंकाची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल आहे. तिचे आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कोणत्याही महागड्या क्लासेसचा आधार न घेता प्रियंकाने गावातच राहून YouTubeच्या माध्यमातून NEET परीक्षेची तयारी केली आणि कठोर परिश्रम, जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले.

आपल्या यशानंतर प्रियंका ही सुधीर मुनगंटीवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी चंद्रपूर येथील कार्यालयात गेली होती. यावेळी तिची जिद्द, अभ्यासाची आवड आणि प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेले यश पाहून सुधीर मुनगंटीवार यांनी तिचे कौतुक करत १२ हजार रुपयांचे बक्षीस देऊन सत्कार केला.

या प्रसंगी प्रियंकाचे वडील गोपाल मंडल हे आपल्या मुलीच्या यशाने व सत्काराने भारावून गेले. यावेळी शाळेचे मार्गदर्शक शिक्षक मेनिचंद राठोड, घुंगरुडकर, नैताम आणि सुरपाम यांची उपस्थिती होती.

प्रियंकाने प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले असून, तिच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post Next Post