Top News

गणेश तर्वेकर आक्रमक; महिनाभरातच सोलर प्रकल्प कोसळला, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

 



नागभीड : नागभीड शहरातील बिक्केवार चौक येथे नगरपरिषदेच्या माध्यमातून अवघ्या महिनाभरापूर्वी उभारण्यात आलेला सोलर प्रकल्प अचानक कोसळल्याची गंभीर घटना आज घडली. सोलर पॅनल, पाण्याची टाकी आणि लोखंडी स्ट्रक्चर खाली कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घटनेच्या वेळी चौकात नागरिकांची वर्दळ असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.


महिनाभरातच सोलर प्रकल्प कोसळल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

अवघ्या एका महिन्यातच सोलर प्रकल्प कोसळल्याने सोलर प्रकल्पाच्या बांधकामाचा दर्जा, वापरण्यात आलेले साहित्य, लोखंडी स्ट्रक्चरची मजबुती, तांत्रिक मंजुरी आणि कंत्राटदाराच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच नगरपरिषद प्रशासनाकडून विकासकामांची पाहणी व देखरेख योग्य प्रकारे झाली होती का, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.

दोषींवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि तांत्रिक चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार, अधिकारी आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. तसेच आवश्यकतेनुसार संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजप गटनेते गणेश तर्वेकर तसेच नगरसेवक अवेश पठाण, सचिन आकुलवार, हेमंत नन्नावरे, शिल्पा शेंडे आणि प्रिया लांबट यांनी केली आहे.

अंदाजपत्रकापासून बिलांपर्यंत तपासणीची मागणी

या सोलर प्रकल्पाची सखोल चौकशी करताना खालील बाबी तपासण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे—

  •  प्रकल्पाचे अंदाजपत्रक
  •  निविदा प्रक्रिया
  •  वर्क ऑर्डर
  • कंत्राट व करारातील अटी
  •  वापरण्यात आलेल्या साहित्याचा दर्जा
  • मोजमाप पुस्तिका (MB)
  •  तांत्रिक व गुणवत्ता तपासणी अहवाल
  •  पूर्णत्व प्रमाणपत्र
  •  संबंधित देयके व बिलांची नोंद
  • प्रकल्पाची तांत्रिक मंजुरी व देखरेख

या सर्व कागदपत्रांची तपासणी करून नेमकी जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


नगरपरिषद प्रशासनाच्या देखरेखीवरही प्रश्न

नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांच्या जीविताशी संबंधित सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या संरचनांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

भाजप गटनेते गणेश तर्वेकर आणि नगरसेवकांनी नगराध्यक्ष व संबंधित पदाधिकाऱ्यांवर शहरातील विकासकामांच्या गुणवत्तेकडे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे.


“आज मोठी दुर्घटना टळली; दोषींना पाठीशी घालू नये”

“अवघ्या एका महिन्यात सोलर प्रकल्प कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आज मोठी दुर्घटना टळली आहे. भविष्यात नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी दोषींना पाठीशी न घालता तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी भूमिका गणेश तर्वेकर व नगरसेवकांनी मांडली.

शहरातील इतर सोलर प्रकल्पांचीही तपासणी करा

दरम्यान, नागभीड शहरात नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या इतर सर्व सोलर प्रकल्पांचीही तातडीने तांत्रिक तपासणी करण्यात यावी. संबंधित प्रकल्प नागरिकांसाठी सुरक्षित आहेत की नाहीत, याची खात्री करून आवश्यक दुरुस्ती तातडीने करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Previous Post Next Post