Top News

पावसातही १७०० नंदींसह बालगोपालांचा उत्साह; नागभीडमध्ये तान्हा पोळा उत्साहात

 



नागभीड : आमदार बंटी भांगडिया मित्र परिवार, नागभीड तालुका यांच्या वतीने बाजार चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या तान्हा पोळा उत्सवाला पावसातही बालगोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल १७०० पेक्षा अधिक लाकडी नंदींसह चिमुकले सहभागी झाले होते. आकर्षक वेशभूषा, विविध संदेश देणारी नंदी सजावट आणि ढोल-ताशांच्या गजराने बाजार चौक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार विधानपरिषद मितेश भांगडिया उपस्थित होते. यावेळी गौरव भांगडिया, रुद्र भांगडिया, अर्जुन भांगडिया, चिमूर विधानसभा भाजपा प्रमुख तथा गटनेते गणेश तर्वेकर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मानद सचिव अवेश पठान, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे, भाजपा नागभीड मंडळ अध्यक्ष संतोष रडके, तळोधी मंडळ अध्यक्ष हेमंत लांजेवार, माजी बांधकाम सभापती तथा नगरसेवक सचिन आकुलवार, प्रथम नगराध्यक्ष प्रा. उमाजी हिरे, प्रतिष्ठित व्यापारी अनिल लांबट, हनीफ जादा, निमजे, माजी सरपंच जहांगीर कुरेशी, सोसायटी अध्यक्ष भूपेश चिलबुले,के.आत्माराम,भाजपा नेते अजय काबरा, प्रा. लोमेश दुधे, रामदास बहेकार, मंगेश सोनकुसरे, भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रिया लांबट, नागभीड तालुका भाजपा अध्यक्ष नितू गुरुपुडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 



कार्यक्रमाची सुरुवात बाजार चौक परिसरातील गणेश मंदिरात विधिवत पूजा करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नंदीची पूजा करण्यात आली व मानाची मशाल प्रज्वलित करण्यात आली. बाजार चौकातील ओट्यांवर उभारण्यात आलेल्या कायमस्वरूपी शेडमुळे पावसातही तान्हा पोळा उत्सव सुरळीत पार पडला. नंदी घेऊन आलेल्या बालगोपालांसह पालकांना या शेडचा मोठा आधार मिळाला. नागरिकांच्या सोयीचा विचार करून आमदार बंटी भांगडिया यांच्या पुढाकारातून या ओट्यांवर कायमस्वरूपी शेडची उभारणी करण्यात आली आहे. 


तान्हा पोळ्यानिमित्त लाकडी नंदी बैल सजावट स्पर्धा आणि आकर्षक वेशभूषा स्पर्धा अशा दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही स्पर्धांसाठी एकूण २० बक्षिसे ठेवण्यात आली होती. सायकल, स्कूल बॅग तसेच रोख रक्कम अशा स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. पालकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करून दहा शिलाई मशीन बक्षीस म्हणून देण्यात आल्या.

सर्वोत्तम वैयक्तिक वेशभूषा स्पर्धेत आर्यन अजय धुळसे याने प्रथम क्रमांक मिळविला, तर सर्वोत्तम नंदी सजावट स्पर्धेत दर्शित मंगेश पिसे याने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत सहभागी प्रत्येक बालगोपालाला आमदार बंटी भांगडिया यांच्या सौजन्याने भेटवस्तू देण्यात आली.


यंदाच्या तान्हा पोळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे चिमुकल्यांनी साकारलेल्या विविध आकर्षक वेशभूषा व नंदी सजावटीतून देण्यात आलेले सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संदेश. पारंपरिक शेतकरी संस्कृतीपासून विविध सामाजिक विषयांपर्यंतचे संदेश बालगोपालांनी आपल्या कलाकृतीतून मांडले. पावसाची रिपरिप सुरू असतानाही बालगोपालांचा उत्साह कुठेही कमी झालेला दिसला नाही. परिसरात वाजणाऱ्या डायकांनी पारंपरिक पोळा संस्कृतीची जाणीव करून दिली, तर ढोल-ताशांच्या गजराने वातावरण अधिकच उत्साहपूर्ण झाले. 


प्रास्ताविकातून गणेश तर्वेकर यांनी तान्हा पोळा आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. पावसातही मोठ्या संख्येने बालगोपाल नंदी घेऊन उपस्थित राहिल्याचे सांगत, बाजार चौकातील ओट्यांवर असलेल्या कायमस्वरूपी शेडमुळे सहभागी बालगोपाल व पालकांना पावसाचा त्रास झाला नसल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या सोयीसाठी ही शेडची उभारणी करण्यात आल्याने बंटीभाऊ भांगडिया यांची दूरदृष्टी यात दिसून येते, असेही त्यांनी सांगितले. प्रमुख अतिथी मितेशजी भांगडिया यांनी उपस्थित बालगोपाल, पालक व नागरिकांना तान्हा पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. 



हनीफ जादा, हेमंत कदम, प्रमोद सातपैसे व सुमित वाधवानी यांच्या वतीने बालगोपालांसाठी बिस्कीट व चॉकलेटची व्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता काला वाटपाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग भानारकर यांनी केले.

Previous Post Next Post