किर्गिस्तानमधील १३व्या वर्ल्ड सिनियर-ज्युनिअर स्ट्रेंथ लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व; ६८ किलो वजनी गटात दोन सुवर्णपदकांची कमाई
नागभीड : किर्गिस्तान येथे ८ ते १२ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १३व्या वर्ल्ड सिनियर-ज्युनिअर स्ट्रेंथ लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये नागभीडच्या विजय संजय दैवलकर याने दमदार कामगिरी करत भारताचा तिरंगा दिमाखात फडकवला. ६८ किलो वजनी गटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना विजयने वर्ल्ड स्ट्रेंथ लिफ्टिंग तसेच इन्क्लाइन बेंच प्रेस चॅम्पियनशिप या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावत दुहेरी जागतिक यश संपादन केले.
जगभरातील नामांकित खेळाडूंच्या सहभागामुळे या स्पर्धेला मोठे महत्त्व होते. अशा कडव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजयने आपल्या ताकद, कौशल्य आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याच्या या कामगिरीमुळे नागभीडसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
के. के. फिटनेसमध्ये घेतले कठोर सरावाचे धडे
विजयने या जागतिक स्पर्धेच्या तयारीसाठी के. के. फिटनेस जिममध्ये कठोर सराव केला. त्याचे प्रशिक्षक शुभम सुरपाम यांनी विजयच्या यशाबद्दल त्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“विजय अत्यंत मेहनती मुलगा आहे. घरची तसेच वैयक्तिक जबाबदारी सांभाळून तो दररोज न चुकता सराव करायचा. त्याच्या मेहनतीचेच हे फलित आहे. पुढेही तो देशासाठी अशीच उत्कृष्ट कामगिरी करत राहील,” असा विश्वास प्रशिक्षक शुभम सुरपाम यांनी व्यक्त केला.
आर्थिक अडचणींवर मात करत गाठले जागतिक व्यासपीठ
विजयचे हे यश केवळ दोन सुवर्णपदकांपुरते मर्यादित नसून, त्यामागे त्याचा संघर्ष, जिद्द आणि कठोर मेहनत आहे. वडिलांचे छत्र हरपलेले असताना तसेच आर्थिक परिस्थिती अत्यंत तंग असतानाही विजयने आपली जिद्द कायम ठेवली.
जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याने बँकेचे कर्ज घेत किर्गिस्तान गाठले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःच्या मेहनतीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावले.
प्रतिभावान खेळाडूंना स्पॉन्सरशिपची गरज
विजय दैवलकरसारख्या प्रतिभावान खेळाडूंना योग्य वेळी आर्थिक मदत आणि स्पॉन्सरशिप मिळाल्यास ते भविष्यात देशासाठी आणखी मोठी कामगिरी करू शकतात. विजयच्या दुहेरी सुवर्णयशामुळे नागभीडच्या क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली असून, त्याच्या पुढील वाटचालीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
