स्व. कमलबाई श्रीहरीजी सिद्धम यांनी १९६२ मध्ये सुरू केलेला उत्सव आजही उत्साहात; यंदा विविध वेशभूषेत बहुसंख्य बालगोपालांचा सहभाग..!!
नागभीड : शहरातील बजरंग चौक येथे साजरा होणाऱ्या तान्हा पोळ्याला यंदा ६५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा पूर्ण झाली. नागभीडमधील सर्वांत जुन्या तान्हा पोळ्यांपैकी एक असलेल्या या उत्सवाला यंदाही बालगोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावर्षी विविध वेशभूषेत नंदीबैल घेऊन बहुसंख्य बालगोपाल उत्सवात सहभागी झाले होते.
नागभीडचे जुन्या काळातील प्रसिद्ध डॉक्टर स्व. आनंद सिद्धम यांच्या मातोश्री स्व. कमलबाई श्रीहरिजी सिद्धम यांनी १९६२ मध्ये या तान्हा पोळ्याची सुरुवात केली. त्यावेळी त्यांचा नातू अभय ऊर्फ राजूभाऊ आनंदजी सिद्धम याच्या लहान मित्रांना मनोरंजनाचे साधन मिळावे, त्यांना शेतकरी जीवन, प्राणीप्रेम आणि आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी तसेच बालकांमध्ये एकोपा निर्माण व्हावा, या उद्देशाने आताच्या बजरंग चौकातील आपल्या वाड्यात प्रसाद व काला वाटून या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
सिद्धम परिवाराने सुरू केलेली ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. सिद्धम परिवार ब्रह्मपुरी येथे स्थायिक झाल्यानंतरही स्व. महादेव रामगुंडे, स्व. काशिनाथ बोटकावर, स्व. जगदीशभाऊ कामडी, स्व. महेश नागापूरे, महादेव सेलोरे, मधुकरजी झाडे, राजूभाऊ झाडे आदींच्या माध्यमातून या तान्हा पोळ्याची परंपरा पुढे नेण्यात आली. २००१ पासून भरत कामडी, दिग्विजय झाडे, रवी नागापूरे यांच्या सहकार्याने उत्सवाला अधिक व्यापक स्वरूप मिळाले. आज ३० पेक्षा अधिक तरुण युवक या उत्सवाच्या आयोजनात सक्रियपणे योगदान देत आहेत. या तान्हा पोळ्यात मानाचा नंदी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून चिल्लुरे परिवारातील नंदी असतो..!!!
परंपरेला सलाम; सिद्धम परिवाराचा सन्मान
यंदाच्या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तान्हा पोळ्याची सुरुवात करणाऱ्या सिद्धम परिवारातील सदस्यांना बजरंग चौक तान्हा पोळा उत्सव समितीने प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले. स्व. डॉक्टर आनंद सिद्धम यांच्या पत्नी श्रीमती लीलाबाई आनंद सिद्धम आणि त्यांचे पुत्र उमेश आनंदजी सिद्धम, ब्रह्मपुरी हे कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी उत्सव समितीच्या वतीने श्रीमती लीलाबाई आनंद सिद्धम यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ६५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या परंपरेचे स्मरण होताच त्या भारावून गेल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने उपस्थितांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले.
राजकीय आयोजनांपेक्षा ऐतिहासिक वारसा जपणारा उत्सव आज शहरातील अनेक भागांत विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तान्हा पोळ्याचे आयोजन केले जाते. मात्र बजरंग चौकातील तान्हा पोळ्याला नागभीडच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासात विशेष स्थान आहे. कोणत्याही राजकीय चौकटीपेक्षा बालकांना शेतकरी संस्कृती, प्राणीप्रेम आणि परंपरेची ओळख करून देणारा हा उत्सव गेल्या सहा दशकांहून अधिक काळ लोकसहभागातून सुरू आहे, हे त्याचे वैशिष्ट्य ठरले आहे.
यंदा सहभागी झालेल्या बालगोपालांना नगरसेवक संजय अमृतकर यांच्या वतीने पाण्याच्या बाटल्यांचे, तर नगरसेविका प्रिया लांबट यांच्या वतीने चॉकलेटचे वितरण करण्यात आले. उत्सव समितीच्या वतीने बालकांना विविध शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी श्रीमती लीलाबाई सिद्धम, उमेश आनंद सिद्धम, सुधाकर जाधव, अतुलभाऊ चिल्लुरे, मधुकर झोडे, श्रीमती संध्या विष्णूपंत जोशी , नगरसेवक संजय अमृतकर, नगरसेविका सुनीता डोईजड, नगरसेविका प्रिया लांबट यांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरत कामडी, राजू झाडे, रवींद्र पोलकमवार, रवी नागपुरे, प्रफुल सेलोरे, सूरज चौधरी, निखिल उराडे, दिग्विजय झाडे, सतीश जीवतोडे, पराग भानारकर, बाळू ठाकरे, राजू लांजेवार, मंगेश जाधव, वेदांत रामगुंडे, पंकज धुळसे, अथर्व रामगुंडे, रोमी कटारे, आशुतोष समर्थ यांच्यासह तीसहून अधिक युवकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जीवतोडे सर यांनी केले. राजू झाडे यांनी प्रास्ताविकातून तान्हा पोळ्याच्या ६५ वर्षांच्या परंपरेचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. अखेरीस काला वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.


