Top News

सरस्वती ज्ञान मंदिरात तान्हा पोळा उत्साहात...राधा-कृष्ण वेशभूषा, सामाजिक संदेशांचे फलक अन् नंदी सजावटीने विद्यार्थ्यांनी जपली ग्रामीण संस्कृती..

 



नागभीड : ग्रामीण शेती संस्कृती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाशी विद्यार्थ्यांची नाळ जोडली जावी, तसेच पारंपरिक सणांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ‘कानडा राजा पंढरीचा’ या भक्तिगीताच्या सुमधुर भजन गायनाने आशा राजूरकर  यांच्या सादरीकरणातून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे होते, तर संस्थाध्यक्ष संजय गजपूरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पालक प्रतिनिधी मंगेश चिलबुले यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला. अनेक विद्यार्थी राधा-कृष्णाच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेत नंदी सजवून आणले. त्यामुळे शाळेच्या परिसरात ग्रामीण संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडले.




यावेळी मार्गदर्शन करताना संस्थाध्यक्ष संजय गजपूरे विद्यार्थ्यांनी शिस्त, संयम आणि संस्कार यांचे पालन करावे, असे आवाहन केले. तान्हा पोळ्याच्या माध्यमातून शेती, शेतकरी आणि बैलांचे ग्रामीण जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना भेटवस्तू तसेच बिस्कीट पुडे देण्यात आले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने तोरण सोडून तान्हा पोळा फोडण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गजपूरे  यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक गोकुळ पानसे  यांनी केले.

यावेळी आशिष गोंडाने, आशा राजूरकर , किरण गजपूरे , पराग भानारकर , सतीश जिवतोडे , नेहा कावडकर , अंकिता गायधने , डबले  यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post Next Post