Top News

नागभीडमध्ये ६ सप्टेंबरला महिला शक्तीचा महासंगम; चित्रा वाघ, शिवानी दाणींची प्रमुख उपस्थिती

 



नागभीड : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, तालुका व शहर नागभीड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्षाबंधन महोत्सवाचे आयोजन रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, नागभीड येथे करण्यात आले आहे. या निमित्ताने नागभीडमध्ये महिला शक्तीचा भव्य मेळावा होणार आहे.

या रक्षाबंधन महोत्सवाला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ तसेच नागपूर महानगरपालिका स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या अतूट नात्याचा, प्रेमाचा, विश्वासाचा आणि संरक्षणाचा पवित्र सण आहे. या पवित्र सणाचे औचित्य साधून महिला भगिनींना एकत्र आणत महिला शक्ती, सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा संदेश देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

चित्रा वाघ आणि शिवानी दाणी यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, नागभीड तालुक्यातील महिला शक्तीचा हा मोठा मेळावा ठरणार आहे. या कार्यक्रमाला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

नागभीड शहर व तालुक्यातील सर्व महिला भगिनी, नागरिक, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्षाबंधन महोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, तालुका व शहर नागभीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post Next Post