Top News

सुरज ठाकरे यांचा इशारा ; WCLच्या कंत्राटी कामांत स्थानिकांना ८०% रोजगार द्या! अन्यथा १६व्या दिवशी तीव्र आंदोलन....

 



राजुरा : WCLच्या विविध कोळसा खाणींमध्ये सुरू असलेल्या OB/माती खोदकाम, उत्खनन, वाहतूक तसेच इतर आउटसोर्सिंग कामांमध्ये स्थानिक भूमिपुत्र आणि सुशिक्षित बेरोजगारांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार नेते  सुरज ठाकरे यांनी केली आहे.

या मागणीसंदर्भात सुरज ठाकरे यांनी बल्लारपूर क्षेत्र, वेकोलि (WCL) येथील क्षेत्रीय महाप्रबंधक कार्यालयात महाप्रबंधक राजेंद्र ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच स्थानिकांना रोजगार देण्याबाबत निवेदन सादर केले.

WCLच्या कंत्राटी कामांमध्ये स्थानिकांना ८० टक्के रोजगाराचे प्राधान्य देण्यात यावे, कंत्राटदारांसाठी स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्याची बंधनकारक अट घालण्यात यावी, तसेच वाहनचालक, ऑपरेटर, हेल्पर, मेकॅनिक, सुरक्षा कर्मचारी आदी पदांवर पारदर्शक पद्धतीने भरती करण्यात यावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

याशिवाय WCL प्रशासन, संबंधित कंत्राटदार आणि स्थानिक प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन रोजगाराच्या प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.

“वर्षानुवर्षे स्थानिकांच्या रोजगारासाठी निवेदने, आंदोलने व उपोषणे करूनही अपेक्षित कार्यवाही झालेली नाही. आता स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळालाच पाहिजे,” अशी भूमिका  सुरज ठाकरे यांनी मांडली.

येत्या १५ दिवसांच्या आत ठोस निर्णय घेऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करत १६व्या दिवशी स्थानिक बेरोजगार व भूमिपुत्रांच्या वतीने WCL कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुरज ठाकरे यांनी यावेळी दिला.

Previous Post Next Post