नागभीड : जनता शिक्षण संस्था, नागभीडच्या ७५ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. शिक्षण क्षेत्रातील वैभवशाली व अविरत सेवेची ७५ वर्षांची परंपरा पुढे नेत संस्थेच्या भावी वाटचालीस प्रेरणादायी सुरुवात व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
अमृत महोत्सवी वर्षाचा एक भाग म्हणून ३१ ऑगस्ट रोजी संस्थेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणाचा संदेश, भविष्याचा संदेश आणि एकतेचा संदेश’ देणाऱ्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावी तसेच अकरावी व बारावीतील सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन संस्था अध्यक्ष डॉ. अमीर धमाणी यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष अतुल चिल्लूरे, उपाध्यक्ष चक्रधर रोहनकर, सचिव डॉ. रवींद्र कावळे, सहसचिव रवींद्र समर्थ, संस्था सदस्य गुलजार धमाणी आणि सदस्या लैला अमीर धमाणी यांच्या हस्ते संस्था पताका दाखवून करण्यात आले. मॅरेथॉनला सुरुवात होताच संपूर्ण नागभीड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थी तसेच नागरिकांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्पर्धेनंतर चारही गटांतील विजेत्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
इयत्ता ११वी ते १२वी मुलांच्या गटात कार्तिक विनोद आत्राम याने प्रथम, अनुज याने द्वितीय तर जीवनराज ठवरे याने तृतीय क्रमांक मिळविला.
इयत्ता ८वी ते १०वी मुलांच्या गटात तुषार प्रमोद शेळके प्रथम, नैतिक गणेश मिसार द्वितीय तर मनीष मोहन अनवले तृतीय क्रमांकावर राहिले.
इयत्ता ११वी ते १२वी मुलींच्या गटात तन्वी शंकर करुडकर प्रथम, अक्षरा हरिदास देशमुख द्वितीय तर अंजली कृष्णा नारनवरे तृतीय क्रमांकावर राहिल्या.
इयत्ता ८वी ते १०वी मुलींच्या गटात सुहानी सुधीर जीवतोडे प्रथम, ऐश्वर्या प्रवेश दडमल द्वितीय तर मानवी जयेंद्र नागापुरे हिने तृतीय क्रमांक पटकावला.
यावेळी बोलताना डॉ. अमीर धमाणी यांनी क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये खेळाडूवृत्ती निर्माण होण्यासोबतच मॅरेथॉनसारख्या उपक्रमातून भविष्याकडे वाटचाल करणारी युवा पिढी घडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
‘ही केवळ मॅरेथॉन स्पर्धा नसून शिक्षण संस्थेच्या भविष्याचा वेध घेणारी वाटचाल आहे,’ असे सांगत शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा देणारी युवा पिढी निर्माण करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला प्राचार्य एस. टी. कोरे, उपप्राचार्य सी. यू. रोहनकर, पर्यवेक्षक एस. डी. जाधव, जनता कन्या विद्यालयाच्या प्राचार्या आर. पी. मेश्राम, पर्यवेक्षक सतीश नरडंगे आणि जनता कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सीमा देशमुख उपस्थित होत्या.
मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीप्रमुख मायकेल बोरकर यांच्यासह सतीश मेश्राम, रूपाली पाथोडे, अंकुश मातेरे, प्रमोद बोरकर, प्रवीण मेंढे, वासुदेव सातपैसे, राजेंद्र मेश्राम, गजेंद्र धुर्वे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. स्पर्धा शिस्तीत पार पाडण्यासाठी नागभीड पोलीस विभाग आणि आरोग्य विभागाचे विशेष सहकार्य लाभले. मॅरेथॉनमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



