Top News

नागभीडमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाचा उत्साह; ‘सद्भावना दौड’ स्पर्धेत चेतन मानकर आणि सानिया कोलते प्रथम




नागभीड : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे क्रीडा विभागाच्या वतीने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘सद्भावना दौड’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष स्मिता खापर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिलाषा जयस्वाल, नगरसेवक आरजू जुगनाके, संजय गजपुरे, श्रीकृष्ण देव्हारी तसेच नागभीड शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ‘सद्भावना दौड’ स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेत महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांच्या दौड स्पर्धेत चेतन दिलीप मानकर याने प्रथम, प्रज्वल दिलीप घोनमोडे याने द्वितीय, तर केतन किशोर ढोणे याने तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थिनींच्या गटात सानिया सोमेश्वर कोलते हिने प्रथम, धनश्री संजय सहारे हिने द्वितीय, तर प्राची प्रमोद लोखंडे हिने तृतीय क्रमांक मिळविला.

प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला २,५०० रुपये, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्याला २,००० रुपये तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला १,५०० रुपये रोख पारितोषिकासह सन्मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन प्रा. किशोर बोरकर यांनी केले, तर आभार प्रा. धनंजय मडावी यांनी मानले.

या स्पर्धेतील पारितोषिकांसाठी अभिषेक जयस्वाल, नरेंद्र हेमने, गणेश तर्वेकर, प्रतीक भसीन, स्मिता खापर्डे आणि आरजू जुगनाके यांच्याकडून आर्थिक सहकार्य लाभले. तसेच पुरस्काराचे सन्मानचिन्ह श्रीकृष्ण देव्हारी यांच्याकडून प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नागभीड पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागभीड व्यापारी संघटना, शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Previous Post Next Post