Top News

नागभीडच्या महात्मा गांधी महाविद्यालयात पर्यावरणपूरक राखी स्पर्धा; सुहानी श्रीरामे प्रथम

 



नागभीड : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने पर्यावरणपूरक राखी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्लास्टिक, थर्माकोल तसेच इतर अपघटनशील पदार्थांचा वापर टाळत नैसर्गिक व जैवविघटनशील साहित्यापासून आकर्षक राख्या तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

या स्पर्धेत विविध प्रकारची पाने, फुले, बिया, कापूस, कागद, नैसर्गिक तंतू आणि इतर पर्यावरणपूरक साहित्याचा कल्पकतेने वापर करण्यात आला. ‘प्लास्टिकला नकार आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. स्पर्धेचे संयोजक व वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. विकास मोहतुरे यांनी विद्यार्थ्यांना राखीचा पौराणिक इतिहास सांगत पर्यावरणपूरक राखीचे महत्त्व स्पष्ट केले. स्पर्धेचे आयोजक डॉ. अंकुश कायरकर आणि प्रा. धनंजय मडावी यांनी पारंपरिक सण साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले.

स्पर्धेचे परीक्षण संगीता मेडपल्लीवार मुख्याध्यापिका ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड आणि रक्षदा कढव यांनी केले.

स्पर्धेत बी.एस्सी. भाग २ ची विद्यार्थिनी सुहानी बंडू श्रीरामे हिने तयार केलेल्या राखीला प्रथम पारितोषिक मिळाले. बी.एस्सी. भाग १ ची विद्यार्थिनी प्रगती सुनील गायकवाड हिने द्वितीय पारितोषिक पटकावले. बी.ए. भाग १ ची विद्यार्थिनी मानसी सुभाष नंदुरकर हिला तृतीय पारितोषिक मिळाले, तर अक्षिता कावळे हिला प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन बी.एस्सी. भाग ३ ची विद्यार्थिनी झीनत शेख हिने केले, तर आभार बी.एस्सी. भाग २ ची विद्यार्थिनी विशाखा आंबोरकर हिने मानले.

विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ, आरमोरीचे सचिव मनोज वनमाळी, प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख, महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. वनस्पतीशास्त्र विभागाच्या या अभिनव पर्यावरणपूरक उपक्रमाचे महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच उपस्थितांनी कौतुक केले.



Previous Post Next Post