नागभीड : समिधा सेवा संस्था द्वारा संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
संस्थाध्यक्ष गणेश तर्वेकर व संस्थासचिव अजय काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य व मुख्याध्यापिकांना विद्यार्थ्यांनी दिलेल्या गार्ड ऑफ ऑनरने झाली. त्यानंतर ध्वजारोहण व दीपप्रज्वलन करण्यात आले. विविध क्रीडा प्रकारांच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी विविध क्रीडा साहित्याचे प्रदर्शनही भरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी क्रीडा व शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व सांगणारी भाषणे केली. तसेच मॅरेथॉन, डॉजबॉल व फुटबॉल यांसह विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संघभावना, शिस्त आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले.
यावेळी प्राचार्या शुभांगी पोहेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी क्रीडा अत्यंत महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात खेळ व व्यायामाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, क्रीडा विभाग व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.




