नागभीड : नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे तब्बल ६२ वर्षांपासून सुरू असलेली पारंपरिक आखाडा व कुस्तीची परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली जात आहे. गावातील मातीच्या मैदानावर भरलेल्या कुस्तीच्या दंगलीने परिसरातील वातावरण अक्षरशः भारावून गेले.
गावातील जुन्या आखाड्याची परंपरा पुढे नेत आजही युवा मल्ल मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. विविध गावांतून आलेल्या पैलवानांनी आखाड्यात आपले डावपेच, ताकद आणि कौशल्याचे दर्शन घडवले. रंगलेल्या कुस्तींना उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
मातीचा आखाडा, पारंपरिक कुस्ती आणि गावकऱ्यांचा उत्साह यामुळे या कार्यक्रमाला विशेष रंगत आली. आधुनिक काळात पारंपरिक खेळांपासून तरुण पिढी दूर जात असताना गिरगावातील ६२ वर्षांची ही आखाडा परंपरा ग्रामीण संस्कृती आणि क्रीडा वारशाचे जतन करणारी ठरत आहे.
गावातील ज्येष्ठ मंडळी तसेच कुस्तीप्रेमींच्या मार्गदर्शनामुळे ही परंपरा आजही अखंड सुरू असून, आगामी पिढीनेही कुस्तीची ही समृद्ध परंपरा पुढे न्यावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली प्रसंगी उपस्थित विनोद बोरकर अध्यक्ष श्रीलक्ष्मी पतसंस्था गिरगांव शरद सोनवाने उपसभापती आदिवासी सोसायटी गुरूदास चावरे व गावातील नागरिक भरपूर प्रमाणात उपस्थित होते.
