नागभीड : नागभीडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी विजय संजय दैवलकर याने केली आहे. किर्गिस्तान येथे ८ ते १२ सप्टेंबरदरम्यान रंगणाऱ्या १३व्या वर्ल्ड सीनियर-ज्युनियर स्ट्रेंथ लिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी विजयची भारतीय संघात निवड झाली असून, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
६८ किलोखालील वजनगटातून विजय स्पर्धेत सहभागी होणार आहे. स्ट्रेंथ लिफ्टिंगमध्ये सातत्याने केलेल्या सराव, मेहनत आणि विविध स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघातील आपले स्थान निश्चित केले आहे.
किर्गिस्तानमध्ये होणाऱ्या या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत अनेक देशांतील नामांकित खेळाडू सहभागी होणार आहेत. अशा प्रतिष्ठेच्या व्यासपीठावर भारताकडून खेळण्याची संधी मिळाल्याने विजयच्या क्रीडा कारकिर्दीला नवी दिशा मिळाली आहे. नागभीडसारख्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या विजयकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
विजयच्या या निवडीने नागभीडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला असून, त्याच्या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रासह शहरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
