स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला विज्ञान महाविद्यालय, नागभिड येथे कला व विज्ञानशाखेच्या वतीने बी. ए. व बीएस्सी. भाग प्रथम च्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी स्वागत उत्सव फ्रेशर्स-२०२६ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवप्रवेशितांचे स्वागत व मार्गदर्शनाचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या नवप्रवेशिताचे स्वागत कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कु. अभिलाषा राजनजी जयस्वाल होत्या तर मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. संजय सिंग होते मंचावर महाविद्यालय अंतर्गत मूल्यांकन समिती समन्वयक डॉ. विकास मोहतुरे व रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. निलेश गोडे व प्रा. किशोर बोरकर यांची उपस्थिती होती.
कु. अभिलाषा राजनजी जयस्वाल यांनी मार्गदर्शन करतांना, यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत व सातत्य असावे लागते. असे सांगून आपल्या ‘प्रभावी वक्तृत्व शैलीतून शिक्षणाचे आपल्या जीवनात असलेले अनन्य साधारण महत्व’ विषद केले.’ डॉ. संजय सिंग यांनी ‘ परिस्थिती बदलायला वेळ लागते परंतु जिद्द, श्रम आणि सकारात्मक विचार हे यशस्वी होण्यापासून कधीही रोखू शकत नाही.’ असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जी. डी. देशमुख यांनी ‘ सकारात्मक विचार हे संघर्षकाळात योग्य निर्णय घेण्याचे ध्येर्य निर्माण करते.’ असे सांगून ‘ विद्यार्थ्याला महाविद्यालयातील तीन वर्षाच्या काळात उच्च प्रतीचे शिक्षण देण्यात शिक्षक कटिबद्ध आहेत.’ असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाविद्यालयातील डॉ. विकास मोहतुरे, प्रा. किशोर बोरकर यांनी यथोचित मार्गदर्शन केले तथा प्रस्तावना प्रा. निलेश गोडे यांनी केली. संचालन कु. श्रुती अमदाबादि, आदिल शेख यांनी केले तर आभार कु. शुभांगी नवघडे हिने मानले. प्रस्तुत कार्यक्रमाला महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, कला व विज्ञान शाखेचे विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.
