जनसमस्यांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारितेची दखल; अकोल्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मान
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेतर्फे दिला जाणारा सन २०२६ चा ‘लोकस्वातंत्र्य प्रभावी पत्रकारिता गौरव’ हा राज्यस्तरीय पुरस्कार हिवरखेड सर्कलचे अध्यक्ष तथा स्थानिक दिव्यांग युवा पत्रकार मनोज रमेशराव भगत यांना नुकताच प्रदान करण्यात आला. अकोला येथील जैन रेस्ट्रो सभागृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या वेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व अकोल्याचे माजी उपमहापौर श्रीरंगदादा पिंजरकर, देविदास म्हैसने, श्यामबापू देशमुख, योगेश अग्रवाल, साहेबराव तायडे, प्रदीप खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मनोज भगत हे दिव्यांग बेरोजगार संघटना, तेल्हारा तालुका अध्यक्ष असून ते हिवरखेड प्रेस क्लबचे सदस्य आहेत. सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असलेले भगत हे संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. हिवरखेड सर्कलमधील विविध जनसमस्या आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडून त्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत.
पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या मनोज भगत यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल मनोज भगत यांचे विविध सामाजिक संघटना, पत्रकार बांधव, पदाधिकारी तसेच मित्रपरिवार आणि चाहत्यांकडून अभिनंदन होत आहे.
