नागभीड नगर परिषद वाऱ्यावर?; कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीवरून भाजपा नगरसेवक आक्रमक, प्रशासनाचे स्पष्टीकरण...
नागभीड :: शहरातील नागरिकांची कामे रखडत असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर भाजपा गटनेते तथा नगरसेवक गणेश तर्वेकर, नगरसेवक सचिन आकुलवार, हेमंत नन्नावरे व संजय अमृतकर यांनी नागभीड नगर परिषद कार्यालयाला अचानक भेट देत विविध विभागांची पाहणी केली. यावेळी अनेक विभागांत कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्याने नगर परिषद कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नगराध्यक्ष व सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचे नगर परिषद कामकाजाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत नगरसेवकांनी जन्म-मृत्यू दाखले, आवक-जावक विभाग, आस्थापना विभाग, घरकुल विभाग, कर विभाग, पाणीपुरवठा तसेच बांधकाम परवानगी यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये नागरिकांची कामे रखडत असल्याचे म्हटले. अनेक नागरिकांना किरकोळ कामांसाठीही वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी यावेळी समोर आल्या.
काही नागरिकांनी थेट नगरसेवकांसमोर नाराजी व्यक्त करत, “कार्यालयात कर्मचारीच उपलब्ध होत नाहीत, मग काम करायचे कुणाकडे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला.
भाजपा गटनेते गणेश तर्वेकर यांनी प्रशासनावर टीका करत, “नगर परिषद ही नागरिकांच्या सेवेसाठी आहे. कार्यालयीन वेळेत कर्मचारी गैरहजर राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने तातडीने शिस्त लावली पाहिजे. नागभीड नगर परिषद प्रशासन नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवण्यात अपयशी ठरत असेल तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा दिला.
माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार यांनीही नगराध्यक्षांवर निशाणा साधत, “नगराध्यक्षांचा कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर कोणताही अंकुश राहिलेला दिसत नाही. त्यामुळे नगर परिषदेमध्ये शिस्तभंगाचे प्रकार वाढले असून संपूर्ण कारभार ढासळलेल्या अवस्थेत आहे,” असा आरोप केला.
तसेच, “शहरातील मूलभूत प्रश्न प्रलंबित असताना प्रशासन मात्र सुस्त असल्याचे चित्र आहे. नागरिकांना वेळेत सेवा मिळणे ही नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी असून त्यात सातत्याने निष्काळजीपणा होत आहे,” असेही आकुलवार यांनी म्हटले.
▪️ दरम्यान, याबाबत मुख्याधिकारी सोनम देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोपांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सर्व कर्मचाऱ्यांपैकी केवळ एक कर्मचारी अर्धा तास उशिरा आले होते. तसेच वर्ग ३ व वर्ग ४ मधील एकूण चार कर्मचारी वेळेवर उपस्थित नव्हते. काही अधिकारी व कर्मचारी रजेवर, प्रशिक्षणासाठी तसेच फील्ड ड्युटीवर होते. वेळेवर उपस्थित नसणाऱ्यांवर यापूर्वीही योग्य कार्यवाही करण्यात आली असून पुढेही ती करण्यात येईल.”
या अचानक पाहणीमुळे नगर परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली असून आता प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते आणि गैरहजर कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे नागभीडकरांचे लक्ष लागले आहे.
