Top News

अल निनोचा धोका वाढला! चंद्रपुरात जलयुक्त शिवारची कामे तात्काळ पूर्ण करा नाहीतर कंत्राट रद्द’ : जलयुक्त शिवार बैठकीत प्रशासनाचा इशारा

अल निनोचा धोका वाढला! चंद्रपुरात जलयुक्त शिवारची कामे तात्काळ पूर्ण करा नाहीतर कंत्राट रद्द’ : जलयुक्त शिवार बैठकीत प्रशासनाचा इशारा


चंद्रपूर | ‘अल निनो’च्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, पावसाचे जास्तीत जास्त पाणी साठवून शेतीसाठी वापरणे आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत प्रस्तावित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी (मनरेगा) शुभम दांडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बेलपत्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पंत यांनी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत समित्यांच्या तात्काळ बैठका घेण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील मंजूर, सुरू आणि पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेऊन 100 टक्के कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले.

पूर्ण झालेल्या कामांचे पोर्टलवर नियमित मॅपिंग करण्याचे निर्देश देत त्यांनी सांगितले की, अनेक कामे पूर्ण असूनही पोर्टलवर माहिती अपलोड न झाल्यामुळे जिल्ह्याची प्रगती कमी दिसून येते. त्यामुळे संबंधित विभागांनी याबाबत विशेष दक्षता घ्यावी.

कामात टाळाटाळ करणाऱ्या कंत्राटदारांना सक्त ताकीद देऊन कामे पूर्ण करून घ्यावीत, अन्यथा त्यांचे कंत्राट रद्द करण्याची कारवाई करावी, असेही निर्देश देण्यात आले. प्रशासकीय मान्यता आवश्यक असलेल्या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले.

बैठकीदरम्यान महसूल, कृषी, वन, मृद व जलसंधारण, सिंचन, सामाजिक वनीकरण, मनरेगा, ग्रामीण पाणी पुरवठा तसेच भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

जिल्ह्यातील कामांची सद्यस्थिती

चंद्रपूर जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 232 गावांची निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण 3357 कामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी 3099 कामे सुरू आहेत. आतापर्यंत 2918 कामे पूर्ण झाली आहेत. सुरू झालेल्या कामांची टक्केवारी 92.31 टक्के असून पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी 86.92 इतकी आहे.

Previous Post Next Post