Top News

नवीन अभ्यासक्रमानुसार नागभीडमध्ये शिक्षक प्रशिक्षणाला उत्साहात प्रारंभ

 



नागभीड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांच्या वतीने पंचायत समिती नागभीड अंतर्गत इयत्ता दुसरी ते चौथीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षकांचे टप्पानिहाय प्रशिक्षण सांजो पब्लिक स्कूल, नागभीड येथे उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाले आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी सुनीता भंडारे होत्या.


उद्घाटनप्रसंगी संजय गजपुरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमात होत असलेले बदल ही काळाची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, कृतीआधारित अध्यापन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून प्राथमिक शाळा अधिक सक्षम व परिणामकारक बनविण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर असल्याचे त्यांनी नमूद केले. नव्या बदलांचा सकारात्मक स्वीकार करून शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील राहिल्यास शिक्षणाची गुणवत्ता अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, कन्व्हेंट शाळांच्या स्पर्धेत तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून प्रभावी जीवनमूल्यांचे शिक्षण मराठी शाळांमधूनच मिळते, असेही त्यांनी सांगितले.


सन २०२६-२७ मध्ये शाळांमध्ये राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रम, नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी तसेच आवश्यक प्रशासकीय व शैक्षणिक कार्यवाही याबाबत सुनीता भंडारे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी सांजो पब्लिक स्कूलच्या आकुलवार मॅडम, तालुका प्रशिक्षण समन्वयक जगजीवन राऊत, बीआरसी तज्ज्ञ गटाचे सदस्य, प्रशिक्षण सुलभक तसेच तालुक्यातील अनेक शिक्षक उपस्थित होते.


प्रशिक्षणादरम्यान नवीन अभ्यासक्रमातील बदल, त्यामागील उद्दिष्टे, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती आणि वर्गशिक्षणात आवश्यक असलेल्या कृती याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. नागभीडचे गटशिक्षणाधिकारी संजय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणामुळे तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तावृद्धीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. उद्घाटन सत्राचे संचालन संजय येरणे यांनी, तर आभार देवानंद तुळकाणे यांनी मानले.


नवीन अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यांचा विकास हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असून, प्रशिक्षणास तालुक्यातील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

Previous Post Next Post