Top News

संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला 2 कोटींची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे; NTR Foundation व GIC Re कडून मोठी भेट



वाशिम | प्रतिनिधी : वाशिम येथील संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला बंगळुरूस्थित NTR Charitable Foundation Trust यांच्या माध्यमातून आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (GIC Re) यांच्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) निधीतून सुमारे 2 कोटी रुपये किमतीची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे प्राप्त झाली आहेत. अधिष्ठाता डॉ. सतीन मेश्राम यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी झाला.

महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या उपकरणांमध्ये स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागासाठी लॅप्रोस्कोपी व हिस्टेरोस्कोपी प्रणाली, शल्यचिकित्सा विभागासाठी व्हिडिओ एंडोस्कोपी प्रणाली तसेच कर्ण-नाक-घसा (ENT) विभागासाठी मायक्रोडिब्रायडर प्रणाली यांचा समावेश आहे. या आधुनिक उपकरणांमुळे रुग्णालयातील उपचार व शस्त्रक्रियांची गुणवत्ता अधिक उंचावणार असून रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. 


या सुविधांमुळे विशेष उपचारांसाठी आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी इतर शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार आहे. त्यामुळे हजारो रुग्णांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 



या निमित्ताने आयोजित आभासी हस्तांतरण समारंभात GIC Re च्या सहाय्यक महाव्यवस्थापक श्वेता चंद्र मोगवीरा, CSR विभागातील अधिकारी, डॉ. मंजुनाथ राठोड, संस्थापक व अध्यक्ष, NTR Charitable Foundation Trust, तसेच प्रसाद उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सतीन मेश्राम, डॉ. अविनाश जाधव, डॉ. गुजर, डॉ. धर्मेंद्र राऊत, सखाराम थोरात, श्रीकांत गोमासे, विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन डॉ. किशोर पवार, डॉ. स्वाती कलंत्री, डॉ. पूजा कांबळे, डॉ. मयुरी चव्हाण तसेच विद्यार्थी व कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले.



Previous Post Next Post