चंद्रपूर : ताडाळी एमआयडीसी परिसरातील ओमेट वेस्ट प्रायव्हेट लिमिटेड (सिद्धपल्ली कंपनी) येथे कर्तव्यावर असताना युवा कामगार प्रवीण रामदास कुडे, रा. ताडाळी यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर मृत कामगाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वाखाली कंपनीसमोर आंदोलन करण्यात आले. कंपनी व्यवस्थापनासोबत झालेल्या चर्चेनंतर मृताच्या कुटुंबीयांनी कंपनीचा आर्थिक मदत, नोकरी आणि पेन्शनसंदर्भातील प्रस्ताव स्वीकारला.
या दुर्दैवी घटनेमुळे कुडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा आणि भविष्यातील उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुटुंबीयांसोबत कंपनीसमोर आंदोलन सुरू केले. कुटुंबीयांसह कार्यकर्ते रात्रभर कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर ठाण मांडून बसले होते.
सुरुवातीला मृताच्या कुटुंबीयांकडून ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई, मृताच्या मातेला आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणी करण्यात आली होती. जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वाखाली कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती कंपनी व्यवस्थापनाकडून १० लाख रुपयांची आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी आणि मृताच्या मातेला पेन्शन देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. कुटुंबीयांनी हा प्रस्ताव स्वीकारल्याची माहिती देण्यात आली.
या आंदोलनामुळे मृत कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत, रोजगार आणि पेन्शन मिळण्याबाबत सहमती झाल्याचे संघटनेने म्हटले आहे. कामगारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी केलेल्या संघर्षाचे हे महत्त्वपूर्ण फलित असल्याची भूमिका संघटनेने मांडली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार म्हणाले की, कामगाराचा मृत्यू ही केवळ एका व्यक्तीची हानी नसून त्याच्या संपूर्ण कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचे गंभीर संकट उभे राहते. अशा कठीण प्रसंगी संबंधित कुटुंबाला एकटे सोडता कामा नये. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हक्कांसाठी नेहमी ठामपणे उभी राहील.
दरम्यान, या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, कंपनीतील कार्यस्थळावरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा आणि भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, चंद्रपूर यांच्या वतीने दिवंगत प्रवीण रामदास कुडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, त्यांच्या शोकाकुल कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
