अंतिम दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील कळमना आश्रमाचे संत शरण दास ऊर्फ मौनी बाबा यांचे वयाच्या १०५व्या वर्षी निधन झाले. बुधवारी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मौनी बाबांच्या निधनाची बातमी समोर येताच बल्लारपूर, कळमना आणि परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या अंतिम दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
कळमना आश्रमात भाविकांची गर्दी
संत शरण दास यांनी कळमना येथे आश्रमाची स्थापना करून अनेक वर्षे साधना केली. त्यांनी दीर्घकाळ मौनव्रत धारण केले होते. त्यामुळे ते परिसरात ‘मौनी बाबा’ या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी बल्लारपूर तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने कळमना आश्रमात येत असत.
मौनी बाबांच्या निधनाची माहिती मिळताच आश्रमात भाविक व अनुयायांचे आगमन सुरू झाले. दूरवरून आलेले श्रद्धाळू त्यांच्या अंतिम दर्शनासाठी कळमना आश्रमात दाखल होत आहेत. त्यामुळे आश्रम परिसरात भावपूर्ण आणि शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
हरियाणातूनही येणार भाविक
भाविक व अभियंता वैभव जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मौनी बाबांचे हरियाणामध्येही मोठ्या संख्येने भक्त व अनुयायी आहेत. हरियाणाहून भाविक आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत समाधीविषयक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
समाधी देऊन अंतिम संस्कार
मौनी बाबांना समाधी देऊन अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. गुरुवारी भाविकांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दीर्घकाळ साधना, मौनव्रत आणि आध्यात्मिक जीवनामुळे संत शरण दास ऊर्फ मौनी बाबा यांनी भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने भक्त आणि अनुयायांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, अंतिम दर्शनासाठी कळमना आश्रमात भाविकांची गर्दी वाढत आहे.
