Top News

नियमांना हरताळ?; विहित मुदत संपल्यानंतर नागभीड नगरपरिषदेची सभा..!!

 नियमांना हरताळ?; विहित मुदत संपल्यानंतर नागभीड नगरपरिषदेची सभा..!!


 भाजपा नगरसेवकांचा बहिष्कार; जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी..!!


 भाजपा नगरसेवकांची मुख्याधिकाऱ्यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार..!!



नागभीड : नागभीड नगरपरिषदेच्या कारभारात नियम व कायद्यांना जाणीवपूर्वक हरताळ फासला जात असल्याचा गंभीर आरोप करत भाजपा गटनेते तथा नगरसेवक गणेश जे. तर्वेकर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे धडक तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, विहित मुदतीनंतर सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आल्याच्या निषेधार्थ भाजपा नगरसेवकांनी आजच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकत प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

तक्रारीनुसार, नगरपरिषदेची मागील सर्वसाधारण सभा दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी पार पडली होती. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार दोन सर्वसाधारण सभांमधील अंतर ३० दिवसांपेक्षा अधिक असू शकत नाही. त्यानुसार पुढील सभा १० मेपूर्वी घेणे बंधनकारक होते. मात्र संबंधित नियमांना धाब्यावर बसवत ११ मे रोजी सभा आयोजित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपा नगरसेवकांनी आजच्या सभेवर बहिष्कार टाकत हा प्रकार केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा नसून, कायद्याचे उघड उल्लंघन असल्याचा आरोप केला. “कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याकडूनच नियमांची पायमल्ली होत असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.

नगरपरिषदेतील हा प्रकार पदाचा दुरुपयोग आणि कर्तव्यातील गंभीर कसूर असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित अधिनियमातील तरतुदीनुसार जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांवरील जनतेचा विश्वास डळमळीत होईल, असा इशाराही भाजपा नगरसेवकांनी दिला आहे.

नगरपरिषद प्रशासनाकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याने नागरिकांमध्येही तीव्र नाराजी निर्माण झाली असून, “नगरपरिषद कायद्यानुसार चालते की मनमानीने?” असा सवाल शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

निवेदन देताना गटनेते गणेश जे. तर्वेकर यांच्यासह अवेश पठाण, सचिन आकुलवार, हेमंत नन्नावरे, प्रिया लांबट, शिल्पा शेंडे तसेच स्वीकृत नगरसेवक प्रा. डॉ. अमीर धमाणी उपस्थित होते.

Previous Post Next Post