Top News

१२३ नागरिकांना न्याय मिळवून द्या; म्हाडा अधिकाऱ्यांना आ. किशोर जोरगेवार यांचे निर्देश

 


चंद्रपूर : म्हाडाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ एजन्सीकडून १२३ नागरिकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत गुरुवारी आपल्या जनसंपर्क कार्यालयात संबंधित नागरिक आणि म्हाडा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित केली. यावेळी प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रतीक्षेत असलेल्या १२३ नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीला म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय इंगोले यांच्यासह बलराम डोडाणी, करण नायर आणि नकुल वासमवार उपस्थित होते.

बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अनेक वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. फसवणुकीला बळी पडलेल्या १२३ नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी म्हाडा प्रशासनाला दिले.

यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात अनेक गंभीर बाबी समोर आल्या असून त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. नागरिकांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणातील धोरणात्मक आणि शासनस्तरीय अडचणी आगामी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करून संबंधित लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

बैठकीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना सर्व प्रकरणांची तपासणी करून वस्तुस्थितीचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

दरम्यान, म्हाडा वसाहतीतील विविध मूलभूत सुविधांचाही आढावा घेण्यात आला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीजपुरवठा, सार्वजनिक सुविधा आणि इतर नागरी समस्यांबाबत नागरिकांनी आपल्या मागण्या मांडल्या. या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

तसेच नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी म्हाडा परिसरात नियमित जनतादरबार आयोजित करण्याच्या सूचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी दिल्या.



Previous Post Next Post