भद्रावती प्रवेशद्वाराजवळ ट्रॅफिक सिग्नलची मागणी; काँग्रेससह नागरिकांचे आंदोलन
भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार : शहरातील वंदनीय बाळासाहेब प्रवेशद्वारासमोरील नागपूर–चंद्रपूर महामार्गावर वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता येथे तात्काळ ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी काँग्रेस पक्षासह विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी सोमवारी सायंकाळी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
महामार्गावरील या चौकात सतत वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. यापूर्वीही अनेक वेळा संबंधित विभाग व प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली होती. मात्र समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
या पार्श्वभूमीवर ११ मे रोजी सायंकाळी सहा वाजता आंदोलन करण्यात आले. आंदोलनात विनय अंबागरे, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, माजी नगराध्यक्ष सरिता सूर, नगरसेवक अनिल पडोळे, नगरसेवक प्रथम गेडाम, नगरसेविका उषा जाधव, नगरसेविका पल्लवी तामगडे, नगरसेविका सीमा पवार, नगरसेविका कल्पना भुसारी, कल्पना मत्ते यांच्यासह अनेक नागरिक व युवक सहभागी झाले होते.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. नागरिकांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत प्रशासन ट्रॅफिक सिग्नल बसविण्याबाबत कितपत तत्परता दाखवते, याकडे भद्रावतीकरांचे लक्ष लागले आहे.
