संविधान शिक्षण शालेय अभ्यासक्रमात अनिवार्य करण्याची मागणी; बल्हारशाहच्या युवकाचे मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना निवेदन
बल्हारशाह | भारतीय संविधानाचे शिक्षण शालेय स्तरावर स्वतंत्र आणि अनिवार्य विषय म्हणून लागू करण्यात यावे, अशी मागणी बल्हारशाह येथील झाशी राणी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रोहन जयंत कळसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार सुधीर मुनगंटीवार, खासदार प्रतिभा धानोरकर तसेच आमदार किशोर जोरगेवार यांना देण्यात आल्या आहेत.
निवेदनात भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा आधारस्तंभ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला संविधानाची सखोल माहिती मिळणे अत्यंत आवश्यक असून, सध्याच्या शालेय अभ्यासक्रमात संविधान हा स्वतंत्र विषय नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी पुरेशी जागरूकता निर्माण होत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
संविधान शिक्षण अनिवार्य केल्यास विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, सामाजिक जबाबदारी आणि नागरिकत्वाची जाणीव अधिक बळकट होईल. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्क आणि कर्तव्यांविषयी माहिती मिळून जबाबदार नागरिक घडण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय संविधानाचा अभ्यास हा केवळ स्पर्धा परीक्षांपुरता मर्यादित न राहता प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे मत रोहन कळसकर यांनी व्यक्त केले. शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
