नागभीड | गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीशी संलग्न राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथील रसायनशास्त्र विभागाने जैविक इंधन (Biofuel) निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. निलेश गोडे आणि डॉ. अतुल नागपुरे यांच्या संशोधनाला अमेरिकेतील प्रतिष्ठित American Chemical Society (ACS) द्वारे प्रकाशित Energy & Fuels या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये स्थान मिळाले आहे.
संशोधकांनी नॅनो कॉपर तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक नॅनो कॅटालिस्ट विकसित केला आहे. या तंत्रज्ञानामुळे कमी तापमानात अधिक कार्यक्षम पद्धतीने जैविक इंधनाची निर्मिती शक्य होत असून, बायोफ्युल उद्योगासाठी ही मोठी वैज्ञानिक उपलब्धी मानली जात आहे.
सध्या जगभरात पेट्रोलियम इंधनावरील वाढते अवलंबित्व, इंधनटंचाई आणि पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर जैविक टाकाऊ वनस्पतींपासून इंधन निर्मितीचे हे संशोधन भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
डॉ. अतुल नागपुरे यांच्या नावावर आतापर्यंत दोन अमेरिकन पेटंट, एक युरोपियन पेटंट, पाच भारतीय पेटंट तसेच ३० आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध प्रकाशित झाले आहेत. या संशोधनामुळे हरित रसायनशास्त्र, शाश्वत संशोधन आणि नॅनो तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय संशोधकांची जागतिक स्तरावर ओळख अधिक दृढ झाली आहे.
या संशोधनात प्रा. डॉ. शैलेश भगत (लाखांदूर), सीएसआयआर–राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सत्यनारायना चीलुकुरी, डॉ. सुरेश रेवतकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नॅनो कॉपर कॅटालिस्ट वापरून बायोमासपासून कमी वेळेत प्रभावीपणे जैविक इंधन निर्मिती करता येत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. अतुल नागपुरे म्हणाले, "अमेरिकन केमिकल सोसायटीच्या प्रतिष्ठित जर्नलमध्ये आमच्या संशोधनाला मान्यता मिळणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे."
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. मनोजभाऊ वनमाळी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांनी डॉ. अतुल नागपुरे आणि प्रा. निलेश गोडे यांचे अभिनंदन करून पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.
