Top News

नागभीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, नोटबुक व पेन वाटप




नागभीड |  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागभीड येथील सरस्वती ज्ञान मंदिर येथे शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश, नोटबुक व पेन वितरणाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त सेवा कार्यातून आनंद साजरा करण्याचे आवाहन केले होते. तसेच राज्यातील अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत हा शैक्षणिक साहित्य वितरणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.

सरस्वती ज्ञान मंदिरात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. इयत्ता पहिली व पाचवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, तर इतर सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक आणि पेनचे वितरण करण्यात आले. शाळेत प्रामुख्याने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने या उपक्रमामुळे पालकांवरील शैक्षणिक खर्चाचा काहीसा भार कमी झाला.

शाळेत विद्यार्थ्यांकडून कोणतेही शैक्षणिक शुल्क आकारले जात नसून पूर्णपणे मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच डिजिटल शिक्षणाची सुविधा सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाचा लाभ मिळत आहे.

कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मानद सचिव तथा नगरसेवक अवेश पठाण, संचालक तथा नगरसेवक गणेश तर्वेकर, नगरसेवक हेमंत नन्नावरे, संस्थाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे आणि मुख्याध्यापक गोकुल पानसे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून देत अभ्यासात सातत्य राखण्याचे आवाहन केले.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आशिष गोंडाने, किरण वाडीकर, आशा राजूरकर, पराग भानारकर, सतीश जिवतोडे, कावडकर, डबले आणि गायधने यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किरण वाडीकर यांनी केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला बळ देणारे असे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Previous Post Next Post