Top News

Support Wings : यवतमाळातील टाकळी धरण परिसरात भव्य स्वच्छता अभियान; ४० हून अधिक युवकांनी हटविला ७० किलोहून अधिक कचरा

 




यवतमाळ, दि. २८ जून : युवकांच्या सामाजिक बांधिलकीचा आणि पर्यावरण संवर्धनाच्या जाणीवेचा प्रेरणादायी प्रत्यय देणारे भव्य स्वच्छता अभियान रविवारी यवतमाळातील टाकळी धरण परिसरात उत्साहात पार पडले. 'सपोर्ट विंग्स' या युवकांच्या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात ४० हून अधिक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेत परिसरातून ७० किलोहून अधिक प्लास्टिक व इतर घनकचरा संकलित केला.



पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या टाकळी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे रिकामे पॅकेट्स आणि इतर टाकाऊ वस्ती विखुरलेल्या होत्या. स्वयंसेवकांनी सकाळपासून अनेक तास श्रमदान करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. पर्यटकांनाही परिसर स्वच्छ ठेवण्याचे आणि कचरा योग्य ठिकाणी टाकण्याचे आवाहन करण्यात आले.



या अभियानाला ॲड. प्रियदर्शिनी उईके, अध्यक्ष, यवतमाळ नगर परिषद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक करत स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


अभियानादरम्यान स्वयंसेवकांनी केवळ कचरा संकलनावर भर न देता पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला. लहान-लहान कृतीतून मोठे सामाजिक परिवर्तन घडू शकते, हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजापुढे ठेवला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे सहभागी युवकांमध्ये सामाजिक कार्याची भावना अधिक दृढ झाली.




'सपोर्ट विंग्स' ही संस्था देशातील ७० हून अधिक शहरांमध्ये युवकांना सामाजिक परिवर्तनासाठी एकत्र आणण्याचे कार्य करत आहे. समाजसेवा, नेतृत्व विकास, पर्यावरण संरक्षण आणि विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून संस्था युवकांना जबाबदार नागरिक बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. 



यावेळी संस्थेचे संस्थापक तनिष्क अग्रवाल म्हणाले, "स्वच्छ भारत काही मोजक्या मोहिमांमुळे घडणार नाही, तर लाखो नागरिक स्वतःची जबाबदारी स्वीकारतील तेव्हाच खरे परिवर्तन घडेल. समाजातील प्रत्येकाने इतरांकडे पाहण्यापेक्षा स्वतःहून पुढाकार घेतला, तर देश अधिक स्वच्छ आणि सुंदर बनेल."

टाकळी धरण स्वच्छता अभियानाने युवकांच्या सामाजिक सहभागाचे प्रभावी उदाहरण निर्माण केले असून पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज पुन्हा अधोरेखित केली आहे. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ होण्यासोबतच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यातही अशा उपक्रमांना अधिकाधिक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post Next Post