बल्लारपूर | वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती खुल्या खाणीत (Sasti OCM) 127 कामगारांना बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवता न आल्यामुळे कामावरून परत पाठविण्यात आल्याचा आरोप करत पाच प्रमुख कामगार संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या निर्णयामुळे कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण असून, विविध मागण्यांसाठी संयुक्त लढा उभारण्यात आला आहे.
HMS, AITUC, BMS, INTUC यांच्यासह कामगार संघटनांनी उपक्षेत्रीय व्यवस्थापकांना दिलेल्या लेखी नोटिशीत 26 जून ते 1 जुलै 2026 या कालावधीत दोन्ही खाणींच्या प्रवेशद्वारावर गेट मिटिंग घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच 1 जुलैपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
संघटनांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून सकाळी 8.15 वाजेपर्यंत बायोमेट्रिक उपस्थितीची व्यवस्था होती. मात्र नव्या सूचनेनुसार सकाळी 8 वाजताच मशीन बंद करण्यात आल्याने 127 कामगारांची उपस्थिती नोंदली गेली नाही आणि त्यांना काम न देता परत पाठविण्यात आले. त्यामुळे संबंधित कामगारांचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कामगार संघटनांनी दिलेल्या निवेदनात नियमित शिफ्टनुसार हजेरी नोंदविणे, कंत्राटी कामगारांच्या सुविधा, कॉर्पोरेट सॅलरी खाते, ग्रुप इन्शुरन्स, पदनामानुसार काम, वाहतूक सुविधा, पाणीपुरवठा, वाढीव वेतनाची थकबाकी, ओव्हरटाईमसह एकूण 16 मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत.
या प्रकरणामुळे सास्ती खुल्या खाणीतील कामगारांमध्ये असंतोष वाढला असून, वेकोली प्रशासन आणि कामगार संघटनांमधील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
