नागभीड : ईश्वर-रखुमाई चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चव्हाण परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवेगाव व मिनथुर येथील इयत्ता 10 वी आणि 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम मिनथुर येथील समाज मंदिरात आयोजित करण्यात आला.
यावेळी इयत्ता 12 वीतील 18 आणि इयत्ता 10 वीतील 38 अशा एकूण 56 गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, शालेय साहित्य व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
इयत्ता 12 वीमध्ये कु. क्रिस्ती कुळे यांनी 70.67 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर इयत्ता 10 वीमध्ये कु. अश्विनी प्रवीण लतारे यांनी 89 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. या दोन्ही विद्यार्थिनींना ट्रॉफी, शालेय साहित्य व रोख पारितोषिक देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. चावरे, मुख्याध्यापिका, नवेगाव या होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनोद भैया, मुख्याध्यापक, नवेगाव यांनी विद्यार्थ्यांना यशाचे मंत्र दिले. तसेच सौ. विशाखा डोंगरे सरपंच मिनथुर आणि अरुण ईश्वर चव्हाण (बाळापूर) यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी काही पालक आणि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत चव्हाण परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रतीराम चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन सौ. प्रज्ञा चव्हाण यांनी केले, तर अंगद चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
दरवर्षीप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणारा चव्हाण परिवाराचा हा उपक्रम परिसरात कौतुकास्पद ठरत आहे.
