नागभीड नगर परिषद हद्दीतील काही प्रभागांमध्ये हगवण-उलटीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित करत भाजपाचे गटनेते गणेश तर्वेकर व सर्व भाजपा नगरसेवकांनी नगर परिषद मुख्याधिकारी सोनम देशमुख यांना निवेदन सादर करून तातडीने पाणीपुरवठ्याची तपासणी करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील काही भागांमध्ये हगवण-उलटीचे रुग्ण वाढत असल्याने दूषित पाणीपुरवठ्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर परिषदेकडून पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची त्वरित प्रयोगशाळेत तपासणी करण्यात यावी. तसेच जलशुद्धीकरण केंद्र, पाणी साठवण टाक्या आणि संपूर्ण पाईपलाईनची सखोल पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण व दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय ज्या प्रभागांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे, त्या भागात आरोग्य विभागाच्या समन्वयाने विशेष आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्याची मागणीही करण्यात आली. नागरिकांनी उकळून व स्वच्छ पाणी पिण्याबाबत सूचना देण्यात याव्यात तसेच परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गटनेते गणेश तर्वेकर यांनी सांगितले की, नागरिकांचे आरोग्य ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे. कॉलरासदृश्य किंवा इतर साथीचे आजार पसरण्यापूर्वी प्रशासनाने आवश्यक दक्षता घेणे गरजेचे आहे. सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थेची मूलभूत जबाबदारी असून प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी त्यांनी मागणी केली.
यावेळी नगरसेवक अवेश पठाण, सचिन आकुलवार, प्रा. अमीर धम्मानी, हेमंत नन्नावरे, सौ. प्रिया लांबट आणि सौ. शिल्पा शेंडे उपस्थित होते.
नागभीडमधील वाढत्या हगवण-उलटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने पाणीपुरवठ्याची तातडीने तपासणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे
