Top News

चंद्रपूरमध्ये पानटपरीत MD ड्रग्जचा साठा जप्त; 104 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांवर गुन्हा.....जटपुरा गेट परिसरातील कारवाई; स्थानिक गुन्हे शाखेची धाड, शहरात खळबळ




चंद्रपूर |  चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात असलेल्या एका पानटपरीवर स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात MD (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे 104 ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत करण्यात आले असून, त्याची अंदाजे बाजार किंमत 5 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जटपुरा गेट येथील इटनकर पान सेंटर येथे सापळा रचून छापा टाकला. यावेळी संशयित ओम संतोष इटनकर (वय 25) याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपीची तसेच त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता MD ड्रग्जचा साठा आढळून आला.

या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. शहरातील गजबजलेल्या परिसरात अशा प्रकारे अमली पदार्थांचा साठा आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, राज्यात अन्न व औषध प्रशासन आणि विविध तपास यंत्रणांकडून गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ तसेच अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवायांमुळे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. अशातच चंद्रपूरमधील ही कारवाई विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.



Previous Post Next Post