यवतमाळ | देशातील 74 हून अधिक शहरांमध्ये सामाजिक कार्य करणारी युवा संघटना Support Wings यांच्या वतीने रविवार, 28 जून 2026 रोजी यवतमाळ येथील ताकळी धरण परिसरात भव्य स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. यवतमाळमधील सर्वात मोठे युवा-नेतृत्वाखालील स्वच्छता अभियान म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
या अभियानाला यवतमाळ नगर परिषदेच्या अध्यक्षा ॲड. प्रियदर्शिनी उईके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, शेकडो युवक-युवती, स्वयंसेवक आणि पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत.
पर्यावरण संवर्धन, स्वच्छतेबाबत जनजागृती आणि युवकांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ताकळी धरण परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्याचाही प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे.
Support Wings ही देशभरातील 74 हून अधिक शहरांमध्ये कार्यरत युवा संघटना असून, स्वच्छता, पर्यावरण, शिक्षण, रक्तदान आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.
या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी यवतमाळकर नागरिक, युवक आणि स्वयंसेवकांना केले आहे.
