Top News

Fisheries News : शासनाच्या नव्या नियमांचे पालन करा; मान्यता प्राप्त मत्स्यबीज केंद्रातूनच मत्स्यबीज खरेदी करा : पराग भानारकर




नागभीड |  महाराष्ट्र शासनाने मत्स्यबीज खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्ता आणि मत्स्यपालकांचे हित लक्षात घेऊन नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार केवळ शासनमान्य किंवा मान्यता प्राप्त मत्स्यबीज उत्पादन व बीज संकलन केंद्रातूनच मत्स्यबीज खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर नागभीड तालुक्यातील सर्व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन ढिवर-भोई समाजाचे कार्यकर्ते पराग भानारकर यांनी केले आहे.

पराग भानारकर यांनी सांगितले की, अनधिकृत किंवा शासनमान्यता नसलेल्या केंद्रातून मत्स्यबीज खरेदी केल्यास वार्षिक लेखापरीक्षण (ऑडिट) दरम्यान गंभीर आक्षेप नोंदविले जाऊ शकतात. तसेच आवश्यक कागदपत्रे, मान्यता प्रमाणपत्र आणि खरेदीची वैधता सिद्ध करण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेने खरेदीपूर्वी संबंधित केंद्राची शासनमान्यता तपासणे अत्यावश्यक आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, काही बेकायदेशीर किंवा विनापरवाना मत्स्यबीज विक्री करणाऱ्या केंद्रांकडून निकृष्ट दर्जाचे मत्स्यबीज, कमी प्रमाणात पुरवठा किंवा जास्त दर आकारून आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. अशा प्रकारामुळे मत्स्यपालकांचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच मत्स्यउत्पादनावरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

यासोबतच, चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि मत्स्यव्यवसाय विभागाने जिल्ह्यातील अनधिकृत मत्स्यबीज संकलन केंद्रांची तातडीने तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही पराग भानारकर यांनी केली.

नागभीड तालुक्यातील सर्व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून केवळ मान्यता प्राप्त मत्स्यबीज केंद्रातूनच मत्स्यबीज खरेदी करावी. यामुळे मत्स्यबीजाची गुणवत्ता सुनिश्चित होईल, संस्थांचे आर्थिक हित सुरक्षित राहील आणि भविष्यात प्रशासकीय तसेच लेखापरीक्षणाशी संबंधित अडचणी टाळता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



Previous Post Next Post