विदर्भ राज्य आंदोलन समितीची महत्त्वपूर्ण बैठक दि. १५ जुलै २०२६ रोजी चिमूर तालुक्यातील पुयारदंड येथील माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभिये यांच्या मातोश्री आश्रमात संपन्न झाली. बैठकीचे आयोजन विराआंसचे ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी विराआंसचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप होते. यावेळी पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, युवा आघाडी (पूर्व विदर्भ) अध्यक्ष कपिल इद्दे, प्रचार प्रमुख तात्यासाहेब मते, विलास डांगे, प्रीती दीडमुठे,मारोती बोथले तसेच विराआंस सोशल मीडिया सेलचे चंद्रपूर–वर्धा–गडचिरोली विभागीय अध्यक्ष पराग गुंडेवार उपस्थित होते. बैठकीचे संचालन प्रा. डॉ. दिनकर चौधरी यांनी केले.
बैठकीत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा इतिहास, विदर्भ राज्याचे महत्त्व आणि गेल्या १२१ वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी २५ जुलै २०२६ रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळ सिंदखेड राजा येथे राजे लखुजी जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित "विदर्भ राज्य निर्माण जनसंकल्प मेळाव्याच्या" पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
त्यानंतर ९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रांतिदिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक दरम्यान आयोजित "विदर्भ लाँग मार्च" व जाहीर सभेचे नियोजन आणि तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत "स्वतंत्र विदर्भ राज्य मिशन २०२७ : जनजागर अभियान" अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच प्रीपेड वीज मीटर सक्तीला विरोध, शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारी धोरणांविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला.
उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या जनआंदोलनाला अधिक व्यापक करण्यासाठी गावागावांत जनजागृती करण्याचे आवाहन केले.
