पावसाळ्याच्या आगमनानंतर विदर्भातील शेतशिवारात सुरू झालेल्या रोहणा (भातलावणी) हंगामातील निसर्गरम्य आणि कष्टमय ग्रामीण जीवनाचे मनमोहक क्षण युवा छायाचित्रकार हुमेश अमृतकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात प्रभावीपणे टिपले आहेत. हिरव्यागार शेतांमध्ये चिखलात राबणारे शेतकरी, भातलावणीची लगबग, पारंपरिक शेतीची संस्कृती आणि निसर्गाचे मोहक रूप दर्शविणारी त्यांची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांकडून त्यांचे भरभरून कौतुक केले जात आहे.
हुमेश अमृतकर हे "आपलं नागभीड" या लोकप्रिय सोशल मीडिया पेजचे संचालक आहेत. स्थानिक घडामोडी, पर्यटनस्थळे, सामाजिक उपक्रम तसेच ग्रामीण जीवनावर आधारित दर्जेदार छायाचित्रण आणि व्हिडिओद्वारे त्यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या फेसबुक पेजला सध्या जवळपास १० हजार फॉलोअर्स असून, प्रत्येक पोस्टला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यंदाच्या रोहणा हंगामात टिपलेल्या छायाचित्रांमधून विदर्भातील शेती संस्कृती, शेतकऱ्यांचे अथक कष्ट, पावसाळ्यातील हिरवाई आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव अत्यंत प्रभावीपणे समोर आले आहे. आधुनिक काळात पारंपरिक शेतीचे महत्त्व आणि ग्रामीण संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य या छायाचित्रांद्वारे होत असल्याची भावना अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागातील वास्तव आणि निसर्गाचे सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यातून जिवंत करणाऱ्या हुमेश अमृतकर यांच्या छायाचित्रांचे सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत असून, स्थानिक स्तरावर त्यांच्या छायाचित्रणाची विशेष दखल घेतली जात आहे. त्यांच्या या कलाकृती विदर्भाच्या ग्रामीण संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करण्यास आणि शेतीचे वास्तव जगासमोर मांडण्यास निश्चितच हातभार लावत असल्याचे मतही व्यक्त होत आहे.















