Top News

शिवनाळा उपसा सिंचन योजना अंतिम टप्प्यात; लोकसहभागातून जलसमृद्धीकडे वाटचाल

 


नागभीड : विदर्भातील महत्त्वाकांक्षी आणि पायलट प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवनाळा उपसा सिंचन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच नागभीड तालुक्यातील 18 गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत बंद नलिका प्रणाली (PDN) व मायक्रो सिंचनाची कामे SSFM कंपनीमार्फत पूर्णत्वाकडे आली आहेत.

या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांचे व्यवस्थापन अधिनियम 2005 व नियम 2006 नुसार कार्यक्षेत्रात सहा पाणी वापर संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. संस्थांमार्फत नियमित मासिक, सर्वसाधारण, हंगामी, तात्काळ व संयुक्त सभा घेऊन शेतकऱ्यांना विविध बाबींवर मार्गदर्शन केले जात आहे. 


यासोबतच पंपहाऊस येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत OMS Box, DMS Box, Air Valve आणि Outlet Valve यांच्या कार्यपद्धती, उपयोग व देखभालीबाबत अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ तसेच लाभार्थी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. मात्र, संस्थेचे कार्य केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

तांत्रिक साहित्याच्या संरक्षणाची जबाबदारी शेतकऱ्यांची

कार्यक्षेत्रात बसविण्यात आलेले OMS Box, DMS Box, Air Valve व Outlet Valve यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांनी स्वीकारणे आवश्यक आहे. या साहित्याची चोरी किंवा तोडफोड झाल्यास संपूर्ण सिंचन व्यवस्थेवर परिणाम होऊन शेतकऱ्यांना वेळेवर पाणीपुरवठा होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

यासाठी जलप्रधान, जलमित्र आणि जलदूत यांनी नियमित पाहणी करून तांत्रिक साहित्य सुरक्षित राहील याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


लिकेज दुरुस्ती पूर्ण; पाणी सोडण्यासाठी संस्था सज्ज

मागील काही दिवसांपूर्वी चाचणी स्वरूपात पाणी सोडण्यात आले होते. काही भागात पाणी पोहोचले, तर काही ठिकाणी लिकेजमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, सर्व लिकेजची दुरुस्ती पूर्ण झाली असून आता संपूर्ण यंत्रणा पाणीपुरवठ्यासाठी तयार आहे.

अधिकृतपणे पाणी सोडण्याचा अधिकार हा सिंचन विभागाकडे असल्याने पाणी वापर संस्थांनी हंगामी सभा घेऊन पाणी मागणीचे अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

"माझा प्रकल्प, माझे गाव, माझी जबाबदारी"

शिवनाळा उपसा सिंचन योजना यशस्वी करण्यासाठी "माझा प्रकल्प, माझे गाव, माझी जबाबदारी, माझी पाणी वापर संस्था" ही भावना प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याने जोपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकसहभाग, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि तांत्रिक साहित्याचे संरक्षण यामुळेच सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना समन्यायी पद्धतीने पाणी उपलब्ध होणार असून परिसर जलसमृद्धीकडे वाटचाल करणार आहे.

यासाठी पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी शेतकरी तसेच SSFM कंपनी आणि सिंचन विभाग यांना परस्पर सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Previous Post Next Post