नागभीड : चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय कन्या माध्यमिक आश्रमशाळा, चिंधीचक (ता. नागभीड) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर शाळा प्रवेशोत्सव व पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नवागत विद्यार्थिनींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत, प्रभातफेरी, पालक मेळावा, हस्तकला प्रदर्शन आणि वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागृती कुमरे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर या होत्या. उद्घाटन जगदीश सडमाके, सामाजिक कार्यकर्ते, चिंधीचक यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून संजय गजपुरे (माजी जिल्हा परिषद सदस्य), शरद चौधरी (कार्यालय अधीक्षक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर), डॉ. स्वप्नील कांबडी (वैद्यकीय अधिकारी, तळोधी), रूपाली पाथोडे (प्राध्यापिका), हरीजी वरठे (सरपंच, ग्रामपंचायत चिंधीचक), प्रदीप समर्थ (उपसरपंच), प्रविण मसराम (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), गावंडे (शासकीय मुलींचे वसतिगृह, ब्रह्मपुरी) आणि प्रदीप धारणे (पोलीस पाटील, चिंधीचक) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळी ९ वाजता प्रभातफेरीला सुरुवात झाली. आकर्षक सजविलेल्या बैलगाडीतून नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची बँड पथकासह चिंधीचक गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध पारंपरिक वेषभूषेतील विद्यार्थिनींमुळे प्रभातफेरी विशेष आकर्षण ठरली. अध्यक्ष जागृती कुमरे यांनीही बैलगाडीतून मिरवणुकीत सहभागी होत विद्यार्थिनींचे कौतुक केले.मुख्याध्यापक मंगेश ब्राम्हणकर यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या गुणवत्तापूर्ण निकालाची तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. डॉ. स्वप्नील कांबडी यांनी विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. रूपाली पाथोडे यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनण्याचा संदेश दिला, तर जगदीश सडमाके यांनी स्पर्धा परीक्षा आणि करिअर नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात जागृती कुमरे यांनी शाळेने गुणवत्तेचा स्तर अधिक उंचावत विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करावेत आणि शाळेचा तसेच प्रकल्पाचा लौकिक वाढवावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमानंतर विद्यार्थिनींनी तयार केलेल्या हस्तकलेच्या कलादालनाचे मान्यवरांनी अवलोकन करून त्यांचे कौतुक केले. तसेच शालेय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर धारणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप डिब्बे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बोरकर, शहारे, वाढई, देविकर, मसराम, अनिल दोडके, सुरपाम तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला १२५ पालक आणि १४७ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडलेला शासकीय कन्या माध्यमिक आश्रमशाळा, चिंधीचक येथील शाळा प्रवेशोत्सव व पालक मेळावा विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रवासाला प्रेरणादायी सुरुवात ठरला.




