Top News

Top Education News | कोसंबी गवळी आश्रमशाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; अत्याधुनिक 'नमो लॅब'चे लोकार्पण



नागभीड | : चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, कोसंबी गवळी (ता. नागभीड) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ निमित्त शाळा प्रवेशोत्सव व पालक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते शाळेतील अत्याधुनिक 'नमो लॅब'चे लोकार्पण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन संजय गजपुरे यांनी केले, तर अध्यक्षस्थानी बाळासाहेब वटाने, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर होते. प्रमुख उपस्थितीमध्ये भैय्यासाहेब दडमल, कैलास रंधये, दयाराम कन्नाके, धनराज ढोक, प्रभाकर चिमुरकर, गिरीष नवघडे, आशा दडमल, डॉ. भक्ती हिवरकर आणि खुशाल उईके यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लेझीम पथकाच्या गजरात मान्यवर, पालक आणि नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. भगवान बिरसा मुंडा, सावित्रीबाई फुले, वीर बाबुराव शेडमाके आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी शाळेच्या वार्षिक नियोजन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. 


यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पालक व विद्यार्थ्यांसाठीचा संदेश थेट प्रसारित करण्यात आला. तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि आयुक्त लिना बनसोड यांनी ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले.

प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने 'नमो लॅब'चे लोकार्पण करण्यात आले. तसेच राघोजी भांगरे स्मृती पुरस्कारांतर्गत दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या प्रज्ञा रतनलाल गुडेवार, द्वितीय जानवी गुलाबराव एकोडे आणि तृतीय अनिकेत जयपाल शेडमाके यांचा तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र, बाळापूर यांच्या वतीने नवागत विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

प्रास्ताविकात मुख्याध्यापक प्रमोद भांडारकर यांनी शाळेच्या गुणवत्ता विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीसाठी पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. 

उद्घाटक संजय गजपुरे यांनी नागपूर विभागात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल शाळेचे अभिनंदन केले. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असलेली ही परिसरातील आदर्श शाळा असून, पालकांनी या सुविधांचा लाभ घेऊन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

दयाराम कन्नाके यांनी गुरुकुल परंपरेचे महत्त्व विशद केले, तर अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब वटाने यांनी "माझी आश्रमशाळा, माझा स्वाभिमान" ही भावना प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी जपावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीना श्रीरामे यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा प्रवेशोत्सव व पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला.

Previous Post Next Post