नागभीड तालुक्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह झालेल्या मुसळधार पावसादरम्यान चिकमारा येथील जगन्नाथ लहाणू देशमुख यांच्या घरावर वीज कोसळल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचे छप्पर कोसळणे, पत्रे व लाकडी बांधकाम उद्ध्वस्त होणे, भिंतींना तडे जाणे तसेच घरात साठवून ठेवलेले धान्य व अन्य अन्नधान्य पावसाच्या पाण्यामुळे भिजून खराब झाल्याने देशमुख कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
प्रत्यक्ष पाहणीत घराच्या छताचा मोठा भाग कोसळल्याचे, अनेक पत्रे वाकल्याचे, लाकडी तुळया तुटल्याचे तसेच घराच्या आतील खोल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यामुळे देशमुख कुटुंबाच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, पावसाळ्याच्या तोंडावर सुरक्षित निवाऱ्याची गंभीर समस्या उभी राहिली आहे.
मोहरमच्या सार्वजनिक सुट्टीमुळे सुरुवातीला महसूल विभागातील पटवारी घटनास्थळी उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र घटनेची माहिती मिळताच कोतवाल तसेच उपसरपंच हेमराज ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व प्राथमिक पंचनामा केला. त्यानंतर पटवारी यांनीही घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी करून अधिकृत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती मिळाली आहे.




