दिल्ली येथील जंतर-मंतरवर कोक्रोच जनता पार्टीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला विदर्भ राज्य आंदोलन समिती (विराआस) ने जाहीर समर्थन दिले आहे. समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंब्याची अधिकृत घोषणा केली.
कोक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचूक लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहेत. देशभरातील विविध सामाजिक आणि प्रादेशिक संघटनांकडून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या शिष्टमंडळाने जंतर-मंतर येथे भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार ॲड. वामनराव चटप, युवा आघाडीचे प्रांताध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ विभागाध्यक्ष अरुण केदार, पश्चिम विदर्भ विभागाध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, विदर्भ प्रचार प्रमुख तात्यासाहेब मत्ते तसेच कोअर कमिटी सदस्य श्रीमती पद्मा राजपूत यांचा समावेश होता.
यावेळी ॲड. वामनराव चटप यांनी उपोषणस्थळी उपस्थितांना संबोधित करताना लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनांना व्यापक जनसमर्थन मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने कोक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांशी एकात्मता व्यक्त केली.
या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच आंदोलनाच्या उद्दिष्टांबाबत चर्चा केली. विविध प्रादेशिक प्रश्नांवर लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या चळवळींनी परस्पर सहकार्याची भूमिका घ्यावी, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.


